खुलताबादेत कत्तलखान्यावर छापा; १२ जनावरांची सुटका दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Foto

औरंगाबाद- खुलताबाद येथे रविवारी(ता.२) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा मारून बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी आणलेल्या बारा जनावरांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.  

 

खुलताबाद शहरातील कुरेशी मोहल्ल्यात राजरोसपणे जनावरांची कत्तल केली जाते, अशा तक्रारी आहेत. रविवारी पहाटे खुलताबाद पोलिसांनी या कत्तलखान्यावर अचानक छापा मारला. त्यावेळी तेथे एका गायीची कत्तल करताना पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. कत्तलखान्यात पाहणी केली असता, पोलिसांना पाच गायी, पाच लहान कालवडी व दोन बैल आढळून आले. सदरील जनावरे पोलिसांनी ताब्यात घेऊन ती वेरूळ येथील गोशाळेत पाठविली आहेत. 

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या आदेशावरुन आठ दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने वेरूळ येथील एका जुगार अड्ड्यावर छापा मारला होता. त्यामुळे जुगार चालविणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. खुलताबाद पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात. स्थानिक पोलिस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

 

खुलताबाद शहरात कित्येक दिवसांपासून अवैध कत्तलखाना सुरू आहे. याची माहिती पोलिसांना नसेल का, जर माहिती असेल तर पोलिसांनी या कत्तलखान्यावर कारवाई का केली नाही, असे प्रश्‍न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. विशेष पथकाने आपल्याच कार्यक्षेत्रात घुसून अवैध धंद्यांचा भांडाफोड केल्यामुळे खुलताबाद पोलिसांनी ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.